March 30, 2026
शिरूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात सत्याग्रह निलेश वाळुंज यांचे आमरण उपोषण आमदारांच्या भेटीवरून तालुक्यात चर्चा

शिरूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह निलेश वाळुंज यांचे आमरण उपोषण आमदारांच्या भेटीवरून तालुक्यात चर्चा

सुनील भंडारे पाटील 

शिरूर शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी, तरुणाईभोवती वाढत चाललेला एमडी या अमली पदार्थाचा विळखा, हातभट्टी दारूचे पेव, अवैध धंदे, जुगार, मटका, चोऱ्या, दादागिरी व भाईगिरी यांसारख्या गंभीर प्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेले सत्याग्रह आंदोलन आता अधिक तीव्र होण्याच्या दिशेने जात आहे.

बुधवार (ता. १५) पासून सुरू असलेल्या या आंदोलनाद्वारे शासन व विशेषतः पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शिरूर पोलिस ठाण्यासमोर घडलेल्या राड्याची सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणीही वाळुंज यांनी केली आहे.

मात्र, सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने वाळुंज यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी भेट दिल्याची माहिती समोर आली.मात्र, त्यावेळी वाळुंज यांनी मौनव्रत धारण केले होते. या भेटीवरून राजकीय वर्तुळात तसेच शिरूर तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत ‘भरारी’चे संपादक सुनील भंडारे पाटील यांनी वाळुंज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की “यापूर्वीही जून मध्ये मी सामाजिक रस्त्याच्या विषयावर आंदोलन करत असताना याच लोकप्रतिनिधींनी शिरूर मध्ये आलेले असताना ‘हा आपल्या मतदारसंघातील विषय नाही’ असे सांगत दुर्लक्ष केले होते. परंतु त्यावेळी आंदोलन उपोषण हे शिरूर तालुक्यातील विषयावरच याच तहसील कार्यालयात सुरू होते.त्यामुळे अशा भूमिकेच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणे योग्य वाटत नाही. यावेळीही ते पूर्वनियोजित तहसील कार्यालयातील कार्यक्रमासाठी आले होते. शेजारून जाताना त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, मात्र माझे मौनव्रत सुरू असल्याने मी संवाद टाळला असे वाळुंज यांनी सांगितले.

दरम्यान, या भेटीमुळे “ते आले, बसले आणि निघून गेले” अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे,

Loading