तीर्थक्षेत्र आळंदी नेहमी हजारो भाविकांचे गर्दीने फुललेली असते. यात लग्न समारंभ, एकादशी असल्याने अधिकची वाढ झाली. सुमारे ५० हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. उन्हाचा पारा चढलेला असतानाही भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी निमित्त श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील सुरु ठेवली होती. कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी व्यवस्थापक माउली वीर, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे देवस्थानचे सेवक कर्मचारी यांनी काम पाहिले. श्रींचे महाप्रसाद देण्यास सेवाभावी पणे सेवक बल्लाळेश्वर वाघमारे आणि सेवकांनी सेवा रुजू केली. भाविकांना थेट दर्शनबारीत पिण्याचे पाणी देण्यात तत्परता ठेवून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी लक्षपूर्वक नियोजन करण्यात आले होते.
आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, देहुकरांचे कीर्तन सेवा तसेच ह.भ.प. संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर मात्र काही वारकरी , भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी स्नानास गर्दी करीत तीर्थक्षेत्री आचमन केले. आळंदीतील नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली.
