राज्यात शिवपाणंद रस्त्यांच्या हद्दी होणार निश्चित व मागेल त्याला रस्ता खुला करून देण्यात येणार
सुनील भंडारे पाटील
राज्यात जेथे मागणी असेल तेथे शेतरस्ते करण्यात येतील, १४३ च्या नियमानुसार दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहा फुटांची जागा घेऊन १२ फुटांचे रस्ते केले जाणार आहेत.
या रस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जे अधिकारी नियम १४३ चा गैरवापर करून बांधाऐवजी शेतातून रस्ते करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येईल,’’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत बावनकुळे म्हणाले, की जेथे शेतरस्त्यांचा वाद आहे, तेथे नियम १४३ अंतर्गत तहसीलदारांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची सहा फूट अशी १२ फूट रस्त्यांची मोजणी करण्यात येणार आहे.
या मोजणीसाठी मोफत पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. तसेच मोफत मोजणीही करण्यात येणार आहे.राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांना ज्याप्रमाणे नावे आहेत, त्याप्रमाणे पाणंद रस्ते आणि शेतरस्त्यांना क्रमांक दिले जातील.
या राज्याच्या बांधकामासाठी नवीन योजना आणली जाईल. राज्यात जसा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाचा आहे, तेवढेच शिव पाणंद आणि शेतरस्ते महत्त्वाचे आहेत. पुढील पाच वर्षांत एकही शेतरस्ता वादात राहणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे.’
’‘नियमान्वये शेतरस्ते हे बांधावरून गेले पाहिजेत, मात्र काही अधिकारी बड्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत अन्य शेतकऱ्यांच्या शेताच्या मधोमध रस्ता नेतात याबाबत काय कार्यवाही करणार,’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की,
नियमाचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे.दोन शेतांच्या मध्ये असलेल्या बांधावरून रस्ता न्यायचा आहे. मात्र, तसे केले जात नाही. राज्यात ११ हजार प्रकरणे यामुळे वादात आहे. आम्ही नियम १४३ वापराबाबत मार्गदर्शक प्रणाली तयार करत आहोत. त्यात कुणाच्याही शेतातून मधोमध रस्ता करता येणार नाही. तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच शेतरस्त्यांच्या प्रकरणांचा निकाल दिला जाईल.
