शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.जी.पी.सातव, डॉ. सोनाली तळवळीकर, गोरन ग्रोस्कोफ, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. शोभा तितर, डॉ. अशोक शेळके, डॉ. रुपाली शेंडकर, प्रा. गौरी मारणे, प्रियांका जाधव, डॉ. सुनीता डाकले, डॉ. मेघना भोसले, नितीन दळवी, गणेश साबळे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सोनाली तळवळीकर म्हणाल्या की करिअर, नोकरी करण्याच्या प्रयत्नात अनेक महिला स्वतःकडे दुर्लक्ष करीत आहेत. करिअर करणारी कालची तरुणी लग्नानंतर विवाहिता बनली. पत्नी, आई म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेची भूमिका बदलली. पण पुरुषांची भूमिका बदलली नाही. त्यामुळे महिला सतत ताण-तणावाच्या ओझ्याखाली राहतात. लवकर उठणे, स्वयंपाक करणे, मुलांचा सांभाळ करणे तसेच नोकरी असेल तर ती जबाबदारी सांभाळणे या कामाच्या ओझ्याखाली महिला अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज आपल्या देशातील महिलांचे आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर प्राचार्य डॉ. जी. पी. सातव म्हणाले की घरातील गृहिणींचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती इतरांकडे नीटपणे लक्ष देऊ शकते. परंतु तिच स्वत: काही समस्यांनी बेजार झाली तर संपूर्ण कुटुंबच अवस्थ होते हा सर्वांचाच अनुभव आहे. महिलांची मानसिकता बर्याचदा आजार अंगावर काढण्याची असते. तो बळावला तरच त्या वैद्यकीय सल्ला घेण्यास तयार होतात. त्याही दृष्टीने त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचेही प्राचार्य सातव यांनी सांगितले.

