संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान..!
संत निरंकारी मिशनचे पेरणे फाटा सत्संग चे मुखी प. पु. संजय भिलारे जी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता.
बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून मागील वर्षी पासून या परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे .
या अभियाना अंतर्गत जनजागृती करताना पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत माहिती देण्यात आली. ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे असे उपस्थित तुळापूर ग्रामपंचायत चे पदाधिकारी व पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रम वेळी माहिती समिती सेवा अध्यक्ष श्री नवनाथ शेठ शिवले, शिवपुत्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुरंग शेठ शिवले , माजी ग्रा. प. सदस्य तुळापूर नवनाथ शिवले आदी उपस्थित होते या वेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष योगेश शिवले यांचे विशेष सहकार्य लाभले. अशा प्रकारे तुळापूर या ठिकाणी पेरणे फाटा तसेच केंदूर ब्रांच अंतर्गत जल स्वच्छता अभियान पेरणे फाटा ब्रांच चे प्रमुख संजय भिलारे जी व केंदूर सत्संग चे प्रमुख सोमनाथ शिंदे जी तसेच सेवादल संचालक आदरणीय विक्रम पानसरे जी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.
