March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
        श्रीरामपूर शहरामध्ये गुरुवार दिनांक २ मे रोजी काझीबाबा संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवरच धर्मांधांकडून दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात श्रीरामपूर शहरामध्ये अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी काझी बाबा संदल मिरवणुक आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच बऱ्याच वेळ मिरवणूक थांबून होती. पोलिसांनी मिरवणुक पुढे नेहण्या करीता सांगितले असता त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर आणि श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे श्री. चौधरी हे जखमी झाले आहेत. दरम्यान चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जमा झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही बाजूची गर्दी पांगवली होती.

गेल्या वर्षी देखील डिजेवर चिथावणीखोर गाणे लावल्याने याच मिरवणुकीमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावर्षी देखील दगडफेक झाल्याने पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी आता शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.