March 30, 2026
हवेली प्रतिनिधी
       पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद (ता हवेली ) मधील थेऊर चौक व आळंदी फाटा येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यावर वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात याव्या यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये  वारंवार बातम्या देत लक्ष वेधण्यात येत आहे. पण या सगळ्यातून लोणीकंचा वाहतुकीचा प्रश्न कधी सुटेल, याची आशा धरून राहिलेल्या नागरिकांना याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

     पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील थेऊर चौक व आळंदी फाटा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांसह या ठिकाणावरून शहर व ग्रामीण भागात जाणारे शेतकरी वर्ग ,नोकरदार वर्ग , विद्यार्थी आरोग्य वाहीन्या , मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. बेशिस्त वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक पोलिसांची कमतरता यामुळे अपघात व कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. आळंदी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढत असल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही काहीजण रस्त्यावर गाड्या लावत आहेत.

         येथे शासकीय व खासगी शाळेत, महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी प्रवासी वाहनातून केली जाते.  त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो हॉटेलला पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
       यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. पोलीसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना सूचना देण्यात याव्यात यापुढे दंड आकारण्यात यावा तर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून होतेय सामाजिक कार्यकर्ते भारतीय किसान संघ व प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष संस्थापक उत्तम भोंडवे यांनी  मा .जिल्हाधिकारी  व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले तसेच वाहतूक कोंडीला व अपघातांना ठेकेदार मे. बेल्हेकर हेच जबाबदार म्हणून त्यांच्या विरोधात लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे संबंधित प्रशासनाने याची दखल न घेतल्यास त्यांनी ६ डिसेंबरला रोजी बाबासाहेबांच्या स्मृतीदिनी लोणीकंद येथील थेऊर चौकात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे .