March 30, 2026
वाघोली : प्रतिनिधी
             मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने जानेवारीमध्ये उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक ठिकाणी विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जात असताना २३ जानेवारी रोजी रात्री वाघोली येथील चोखी ढाणी रोडच्या मैदानावर मुक्काम होता.

            वाघोलीतील समन्वयकांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे परवानगीचा अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात जरांगे पाटील वाघोलीत पहाटे ४ वाजता पोहोचले आणि एक तासभर पहाटेची सभा झाली होती. आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी (दि.७ मार्च) सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. 

             पोलिसांकडून कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याची परवा नाही. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा हा सुरूच ठेवणार आहे. – अॅड. गणेश म्हस्के
         तब्बल दीड महिन्यांनी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारकडून पोलिसांना पुढे करून मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून ही बाब अतिशय निंदनीय आहे. – सोमनाथ आव्हाळे