चव्हाण हे रात्री साडेबारा च्या दरम्यान कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना शिस्तार वस्ती येथील ओढ्यानाजिक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. आरडाओरड करून चव्हाण यांनी तेथून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, दिनेश गाजरे, आनंद जगताप यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती कळताच शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी गणेश पवार, ऋषिकेश लाड, सविता चव्हाण व महेंद्र दाते यांनी तातडीने घटनास्थळी पिंजरा लावला असून रुग्णालयात धाव घेतली आहे.
बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, वडनेर खुर्द, चांडोह या परिसरात मागील दोन ते तीन महिन्यात बिबट हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी या परिसरात बिबट्यांची संख्या मोठी असून अन्न पाण्याचा शोधात त्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी मोठी भीती निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे यामुळे धोकेदायक बनले असल्याने आम्हास दिवसा वीज मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


