गुन्हे शाखा युनिट-५ चे पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार अकबर शेख यांना माहिती मिळाली की, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगार आदित्य उर्फ दाद्या शिंदे याच्याकडे धारदार शस्त्र असून तो गंभीर गुन्हा करण्यासाठी माळवाडी, हडपसर परिसरात वावरत आहे. माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेऊन एक तलवार जप्त केली.आरोपी आदित्य शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकरयांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस अंमलदार विनोद शिवले,दया शेगर, शशिकांत नाळे, दाऊद सय्यद, पांडुरंग कांबळे, राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.
