महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली असून या योजनेचा लाभ हा 65 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता देण्यात आली आहे व या योजनेच्या माध्यमातून आता 65 वर्षांवरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. जर आपण या योजनेचे स्वरूप पाहिले तर यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व तसेच अशक्तपणा यांचे निराकरण करण्याकरिता आवश्यक असलेल्या उपकरणाची खरेदी करण्यापासून ते मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवता यावी याकरिता मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांच्या द्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त करणार आहेत. तसेच यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल व जे यामध्ये पात्र होतील त्यांना तीन हजार रुपयांचा एक रक्कम थेट लाभ अशा नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजने करिता 480 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली असून राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सध्या संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान असून यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थ यामुळे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच राज्याच्या या योजने सोबत केंद्राची देखील राष्ट्रीय योजना असून ती राज्यातील काही निवडक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत होती परंतु आता हे मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.