March 30, 2026
हवेली प्रतिनिधी 
                 राज्यातील २८८ जागांसाठी दि.२० रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

                 यामध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये ६८.९१ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली असून यामध्ये हवेली तालुक्यात ६५.१९.तर शिरूर तालुक्यात ७३.२२ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे, शिरूर तालुक्यापेक्षा हवेली तालुक्यातील मतदारांची संख्या जास्त असूनही शिरूर तालुक्यामध्ये हवेली तालुक्यापेक्षा मतदानाची टक्केवारी जास्त झाली आहे, 

             मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्यावर प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपापल्या पद्धतीने विजयाचा दावा करत असून मतदानाचा हा वाढलेला टक्का नक्की कोणाचा आणि तो कोणाच्या पथ्यावर पडणार..? याची मतदार संघामधील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू असून अनेक जण आपल्या सोयीस्कर पद्धतीने आमचाच विजय कसा होईल याची आडाखे बांधत आहे.. 
              मतदार संघामध्ये अनेक जण इच्छुक असताना या सर्वांवर मात करून ऐनवेळी ऊबाठा पक्षाकडून महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविणारे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी 40 हजार पेक्षा जास्त भाविकांना उज्जैन यात्रेद्वारे मोफत दर्शन करून आणल्यामुळे तसेच महायुतीच्या लाडक्या बहीण व अन्य काही योजनांमुळे शिवाय हवेलीतील आपला माणूस म्हणून मतदारांनी आम्हालाच साथ दिली आणि विजय आमचाच आहे असा छाती ठोक दावा कार्यकर्ते करत असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पक्षाने मंत्रीपदाचे दावेदार असणारे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी मतदार संघात केलेली विकासकामे, नागरीकांशी असलेलला प्रत्यक्ष संवाद आणि त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, सामाजिक संघटनांचा पाठिंबा यामुळे तेच पुन्हा एकदा विजयी होतील असा दावा त्यांचे कट्टर कार्यकर्ते करत आहेत
               उमेदवारापेक्षा कार्यकर्त्यांचे भविष्य एकंदरीत मतदारसंघांमध्ये पणाला लागले असून मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत,आमदार अशोक पवारांच्या एका कार्यकर्त्याने तर गेले दोन महिन्यांपासून अशोक पवार पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे. तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी ऐनवेळी तारांबळ नको म्हणून विजयी उमेदवाराचे विजयाचे फ्लेक्स अगोदरच तयार करून ठेवले आहेत. 
                 एक्झिट पोलचे आत्तापर्यंत आपापल्या पद्धतीने अनेक अंदाज समोर आले असले तरी यामध्ये  शिरूर हवेली चा आमदार नक्की कोण होणार व नक्की विजयश्री कोणाच्या तरी गळ्यात माळ घालणार यासाठी शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की आहे..