पिंपळे जगताप (तालुका शिरूर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अत्यंत दुःखद घटना घडली असून येथे झालेल्या गंभीर अपघातात दोन मुले व वडिलांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे परिसरात दुःखद वातावरण तयार झाले असून ग्रामस्थांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे, अपघात रोखण्यासाठी तसेच अपघात ग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी आज पिंपळे जगताप येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले,
काल सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी आपल्या दोन चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना तीन व्यक्तींवर काळाने घाव घातला, एका भरधाव नशेत धुंद चालक असणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच अंत झाला, वडील गणेश संजय खेडकर, तसेच तन्मय आणि शिवम असे दोन चिमुकल्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे,
याबाबत मदयधुंद चालकावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले आहेत, आज दिनांक 7 रोजी सकाळी 10 वा पिंपळे जगताप व परिसरातील ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले, ग्रामस्थांनी रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावी तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली, यावेळी शिरूर उप विभागीय पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
