March 30, 2026
भरारी पथकाने केलेल्या खानपट्टा मोजणीचा अहवाल देण्यास टाळाटाळ

खनिकर्म विभागाकडून भरारी पथकाने केलेल्या खानपट्टा मोजणीचा अहवाल देण्यास टाळाटाळ…

सुनील भंडारे पाटील

हवेली तालुक्यातील लोणीकंद, भावडी व फुलगाव हद्दीतील खानपट्टा जमिनीमधील खाणींची सन २०२४ मध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भरारी पथकामार्फत मोजणी करून पंचनामे करण्यात आले होते. संबंधित अहवाल पुणे जिल्हा खनिकर्म विभागाकडे जमा करण्यात आला होता, आता त्या नोंदीच अभिलेखातून गायब झाल्याने खनिकर्म विभागाच्या कार्य पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोणीकंद येथील अर्जदार गणेश जयसिंग शिंदे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत रीतसर अर्ज करून सदर मोजणीची पत्रके, मोजमापे तसेच संपूर्ण नोंदीची माहिती पुणे जिल्हा खनिकर्म विभागाकडे मागविली होती.

मात्र खनिकर्म विभागाने संबंधित माहिती अभिलेख स्वरूपात उपलब्ध नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे अहवाल नेमका कुठे गेला? तो अभिलेखातून गायब झाला आहे का, की जाणूनबुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणामुळे खानपट्टा मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत अर्जदार यांनी जिल्हा खनिकर्म, प्रथम आपिलीय अधीकारी यांच्याकडे अपील दाखल केले आहे.