आपटीतील पुनर्वसन भूखंडांवर बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा आरोप;कारवाई न झाल्यास २३ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
सुनील भंडारे पाटील
आपटी (ता. शिरूर) येथील जिल्हाधिकारी पुनर्वसन अंतर्गत असलेल्या गट नंबर १०८/१ मधील भूखंडांची शासकीय परवानगीशिवाय खरेदी-विक्री झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत ९ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
निळ वादळ संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष दीपिकाताई भालेराव यांनी तहसीलदार, शिरूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गट नंबर १०८/१ मधील पुनर्वसन भूखंडांची विक्री करताना शासकीय परवानगी तसेच पीएमआरडीएची मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर नोंद असलेले सर्व भूखंड बेकायदेशीर ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच गावातील गट नंबर ११४/१ आणि गट नंबर ३६ मधील शेतीची गुंठेवारीही बेकायदेशीरपणे झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी व पुनर्वसन भूखंडावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे आपटी गावातील पुनर्वसन भूखंड प्रकरणाला आता आंदोलनाची किनार लाभण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे चर्चेला उधाण आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


