केसनंद रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्याचा पूर
नागरिकांचे आरोग्य धोक्यात; स्थानिक नेत्यांनी विचारला मनपा अधिकाऱ्यांना जाब
वाघोलीतील सांडपाण्याचा प्रश्न उग्र
खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुर्घटनेची शक्यता
तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
महामार्ग व केसनंदरोडला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह
रस्त्याने ये-जा करताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा जीव टांगणीला
वाघोली प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून केसनंद रोडवर प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांना आरोग्यासह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पुणे मनपा प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिक संतप्त झाले.
नागरिकांचा संताप बघता अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणची स्थानिक नेत्यांसह नागरिकांच्या उपस्थित पाहणी करून मलनिस्सारण सक्शन वाहनाच्या सहाय्याने ड्रेनेजचे चेंबर साफ करण्यात आले,
पाहणी दरम्यान शासन नियुक्त मनपा सदस्य शांताराम बापू कटके, संदीप सातव, गणेश गोगावले, प्रकाश जमधडे यांनी संबधित अधिकाऱ्यांना काही सोसायट्या सांडपाणी सोडत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सोसायट्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
पुणे-नगर महामार्गाला जोडणाऱ्या वाघोली-केसनंद रस्त्याचे अवघ्या काही महिन्यापूर्वीच रुंदीकरण करण्यात आले. निकृष्ट झालेल्या या रस्त्यावर कमी व्यासाचे चार चेंबर बसवण्यात आले.
वारंवार चेंबर तुटून त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. कायमस्वरूपी उपाययोजना न करता संबधित अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर काम करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे.
रस्त्याचे काम गुणवत्तेचे झाले नसल्याने काही महिन्यातंच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. साधारण अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतरात चार ठिकाणी चेंबर आहेत. रस्त्यालगतच अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ड्रेनेज लाईन कमी व्यासाची आहे. प्रवाह जास्त असल्याने साहजिकच सातत्याने चेंबर तूटून रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. कर वसुलीबाबत मनपा प्रशासन तत्परता दाखवते तशीच तत्परता नागरिकांच्या सुविधांबाबत दाखवावी. – संदीप कटके (अध्यक्ष, जीके फाउंडेशन, वाघोली)
संदीप सातव यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडेबोल , काही दिवसांपासून पुणे-नगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरून केसनंद राज्य मार्गावर प्रचंड सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज लाईन नसल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. गेली अनेक वर्षांपासून नागरिकांना या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शासन नियुक्त मनपा सदस्य संदीप सातव, शांताराम बापू कटके, गणेश गोगावले, रामभाऊ दाभाडे आदी स्थानिक नेत्यांनी कधी स्वखर्चातून तर कधी अन्य विभागाच्या सहाय्याने खड्डे बुजवून नागरीकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. परंतु संबधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याने सातत्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. नित्याच्याच त्रास होत असल्याने नागरिक संतप्त झाले. स्थानिक नेत्यांनी मनपाच्या संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला परंतु अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने संदीप सातव चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांना सातव यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. केवळ नोटीसा देऊ नका कारवाई करा. तात्काळ उपाययोजना करा अन्यथा उद्रेक होईल असे खडसावले. ड्रेनेजचे चेंबर पूर्णपणे साफ होईपर्यंत संदीप सातव, शांताराम बापू कटके, गणेश गोगावले, प्रकाश जमधडे स्थान मांडून होते.
शांताराम कटके यांनी घेतली गांभीर्याने दखल : मागील काही दिवसांपासून केसनंद रोडवर वारंवार वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने चोकअप काढले जात असूनही, रात्रीच्यावेळी हे दूषित पाणी पुन्हा रस्त्यावर येत होते. रात्री उशिरापर्यंत केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसरातीलच चार सोसायट्यांनी नियमांचे उल्लंघन करून ड्रेनेजचे पाणी पाईपलाईनद्वारे सार्वजनिक ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःच्या सोयीसाठी इतरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सोसायट्यांचे कृत्य निंदनीय आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन, पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चारही सोसायट्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीर ड्रेनेज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू करून पाण्याचा निचरा केला जात आहे. त्याचबरोबर केसनंद रोडसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला असून लवकरच पक्का रस्त्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती पुणे मनपा शासन नियुक्त सदस्य शांताराम (बापू) कटके यांनी दिली.
आधीच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. त्यातच भर म्हणून केसनंद रस्त्यावरून वाहत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अजूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कायमस्वरूपी उपयोजना केल्या नाहीतर शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल.- अॅड. गणेश म्हस्के (पुणे जिल्हा समन्वयक, शिवसेना)
वाघोली-केसनंद रोडवर मोठयाप्रमाणात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोक आजारी पडले आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचारी यांना चालण्यासाठी देखील रस्ता नाही. या पाण्यामुळे रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाण्याची लवकरात लवकर योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा हेच पाणी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना भेट देण्यात येईल. – प्रकाश जमधडे (सरचिटणीस, पुणे शहर, शरद पवार राकॉं)
यावेळी पुणे मनपा शासन नियुक्त सदस्य शांताराम (बापू) कटके, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, गणेश गोगावले, जीके फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे, केतन जगताप, अनिल बाजारे, मनपा कनिष्ठ अभियंता वसंत शिंदे, मिलिंद खंदोडे व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


